राजापूर : शहरातील जकात नाका ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलमय खड्ड्यांतून वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्यातून अंगावर उडणारे चिखलमिश्रित पाणी चुकवताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडत आहे. हे कमी म्हणून की काय नगर पालिकेने दुरुस्ती करण्यासाठी कुशे मेडिकल परिसरामध्ये जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवलेल्या रस्त्याची अद्यापही दुरुस्ती केलेली नाही.
शहरातील जकात नाका ते जवाहर चौक या मुख्य वर्दळीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर कुशे मेडिकलसमोरील भागामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खड्डे पडले आहेत. या भागातील खड्ड्यांचे प्रमाण पाहता या भागामध्ये डांबरी रस्ता कुठे आहे, याच शोध घेण्याएवढी बिकट स्थिती झाली आहे. रस्त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला याच भागामध्ये सातत्याने वाहतूक कोंडीही होत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी लोकांसह वाहनचालकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. राजकीय पक्षांकडून निवेदनेही दिली आहेत.
लोकप्रतिनिधींकडून खड्डेमय रस्त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही खड्डेमय रस्त्याची समस्या जैसे थे राहिली आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्यातील खड्ड्यांची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने पालिकेने कुशे मेडिकलच्या परिसरात रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवण्यात आला. या साऱ्यामध्ये नगरपालिका प्रशासन दुरुस्तीचे आश्वासन देत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 04/Jul/2025














