रत्नागिरी : शहरालगतच्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, मुसळधार पावसामुळे या रस्त्याला आता चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. वाहनचालक, विशेषतः महिलांना या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत यांच्या हद्दीवरील हा महत्त्वाचा रस्ता दुरुस्त कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पावसाळा सुरू होऊनही दुर्लक्ष कायम
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही रत्नागिरी नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीचा एकही अधिकारी किंवा सदस्य रस्त्याची साधी पाहणी करण्यासाठीही फिरकलेला नाही. सध्या रत्नागिरी नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने नागरिकांची आणखीनच कोंडी झाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य स्थानिक असूनही दुर्लक्ष?
शिरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य याच भागातील असूनही या रस्त्याची डागडुजी न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “येत्या दोन दिवसांत या रस्त्याचा आणि गटारांचा प्रश्न मिटला नाही, तर आम्ही थेट पालकमंत्र्यांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या परिस्थितीला शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य जबाबदार असतील, असेही बोलले जात आहे.
हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 04-07-2025













