रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाइजेशन, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद’ या विषयावर शनिवार, दि. ५ जुलै रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी कळविले आहे. येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे दुपारी १.३० ते ४ यावेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

मुंबईत होणाऱ्या आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची ओळख, बाजार संशोधन आणि लक्ष्यीकरणासाठी धोरणे, व्यापार व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद साधणे, संवाद आणि संबंध निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, यासोबतच, आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती कार्यक्रमाद्वारे सादर केली जाईल. त्यामुळे हे सत्र जागतिक स्तरावर व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या एमएसएमई निर्यातदार, उद्योजक आणि भागधारक या सर्वांसाठीच अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 04/Jul/2025