‘जय गुजरात’ची गर्जना, अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ची घोषणा केली आहे. मराठी आणि हिंदीवरून वाद सुरू असताना आता शिंदे यांच्या जय गुजरातची चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला.

संजय राऊत यांनी ‘जय गुजरात’ वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. “अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले” असं म्हणत टीका केली आहे. तसेच “हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?” असा सवालही विचारला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात ” ची गर्जना केली!
काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. शाह यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. “आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है” असा हा शेर शिंदे यांनी ऐकवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 04-07-2025