राजापूर : अर्जुना धरण 90 टक्के भरले

राजापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व भागातील करक येथील अर्जुना धरण 90 टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने अर्जुना आणि कोदवली नदीकाठच्या गावांसह राजापूर शहराला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरातील अर्जुना हा एक महत्त्वाचा पाटबंधारे प्रकल्प आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून, जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली असून, धरण सध्या 90 टक्के भरले आहे. हवामान खात्यानेही पुढील चोवीस तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

धरण पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल. यामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल. अर्जुना नदी पुढे कोदवली नदीला मिळत असल्याने या दोन्ही नद्यांची पाणी पातळी धोकादायक पातळी ओलांडू शकते. या संभाव्य धोक्याची दखल घेत लांजा पाटबंधारे उपविभागाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अर्जुना नदीच्या काठावर असलेल्या करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगाव, गोठणे-दोनिवडे, सौंदळ, आडवली, परटवली यांसारख्या प्रमुख गावांना याचा थेट परिणाम होऊ शकतो. या सर्व गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिसपाटील यांना आपापल्या भागातील नागरिकांना परिस्थितीची कल्पना देऊन खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 05-07-2025