लांजा : पोलिसांनी शहरात नियमित नाकाबंदी केली होती. त्यात एक दुचाकीस्वार पोलिसांना पाहून न थांबताच निघून गेला. त्यामुळे शंका आलेल्या लांजा पोलिसांनी ई-चलन अॅपवरून माहिती घेतली आणि ही दुचाकी रत्नागिरीतून चोरी झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वेगाने हालचाली करून या दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
लांजा शहरातील आसगे कोर्लेफाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या दरम्यान दुचाकी घेऊन एकजण तेथे आला. तो न थांबता निघून गेल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्या दुचाकीची ई-चलन अॅपवर त्यांनी माहिती घेतली. तेव्हा ही दुचाकी २०२४ मध्ये चोरी झाली असल्याची आणि रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई किशोर पवार व महिला हवालदार साक्षी भुजबळराव यांनी दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला. तो लांजा-आगरवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 05/Jul/2025












