रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून, जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, शास्त्री या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारी भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पावसामुळे पाली येथे आंब्याचे झाड घरावर कोसळून, तर कामथे येथील एका घराचे आणि कोसबी येथील एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ५९.८३ मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड २८.२५ मिमी, खेड ८८.४२, दापोली ३९.२८, चिपळूण ८२.४४, गुहागर ४७.२०, संगमेश्वर ६२.५०, रत्नागिरी ३२.२२, लांजा ७३.६०, राजापूर ८४.६२ मिमी पाऊस झालेला आहे. जून महिन्यात मॉन्सून सक्रिय झाला असला तरी त्याचा जोर तेवढा नव्हता. ऊन-पाऊस असा खेळ सुरू होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी सायंकाळी नाणीज परिसरात अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे रत्नू सूर्याजी रेवाळे यांच्या घराजवळील जुने आंब्याचे झाड मुळासकट उन्मळून थेट घरावर कोसळले. त्यामुळे घरावरील पत्रे व लोखंडी बार, संरक्षक भिंत यांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या तत्काळ मदतीने झाड बाजूला काढण्यात आले. खानू ग्राममहसूल अधिकारी प्रियांका ढोबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. त्यात २ लाख २० २० हजार रुपये नुकसान झाले. पोलिस पाटील नितीन कांबळे, सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण गौरव संसारे यांनी घराची पाहणा केली.

चिपळुणात पावसामुळे कामथे येथील तानाजी कृष्णा खेडेकर यांच्या घराची पडझड झाली असून, सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. कोसबी येथील शंकर गंगाराम सावंत यांचा वाडा कोसळून सुमारे ३ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर व खड्ड्यांत पाणी साचलेले होते. काही ठिकाणी गटारांतील सांडपाणी रस्त्यावर आल्याचे प्रकारही घडले. पॉवरहाऊस येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती. पावसाने जोर धरल्याने शेतकरी राजा सुखावला असून, पेरणीच्या कामांनीही वेग घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 05-07-2025