रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचे बिगुल काल वाजले असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी मोठ मोठे होर्डिंग लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहर आणि नाक्यानाक्यावर होर्डिंग लावले आहेत, परंतु काल विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व बॅनर, होर्डिंग हटवण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघामध्ये १२ लाख २३ हजार ४१३ मतदार यावेळी मतदानाचा हक्क बाजावणार आहेत. यामध्ये ६ लाख ३० हजार ०१६ पुरुष आहेत, तर ६ लाख ८४ हजार ३८७ महिला मतदार आहेत. मतदार यादी पुनर्निरीक्षणाध्ये २० हजार ८७१ नवमतदारांचा समावेश झाला आहे. ९० ते १९ वयोगटातील ६ हजार ६१८, १०० ते १०९ वयोगटात ४१३, तर ११० ते ११९ वयोगटातील १ मतदार असल्याची नोंद आहे.
निवडणूक आयोगाने काल राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभाग आणि प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात एकूण १२ लाख २३ हजार ४१३ मतदार आहेत. यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ८५ हजार २९३ मतदार आहेत. यात १९ लाख ३७ हजार ०४१ पुरुष तर १ लाख ४८ हजार २२५ महिला मतदार आहेत. गुहागर मतदारसंघात २ लाख ४१ हजार ०१० मतदार आहेत. १ लाख १४ हजार ८४२ पुरुष तर १ लाख २६ हजार १६७ महिला, चिपळूण मतदारसंघात २ लाख ७२ हजार ८१३ मतदार आहेत. यात १ लाख ३३ हजार ४४१ पुरुष, १ लाख ३९ हजार ३९० महिला, रत्नागिरी मतदारसंघात २ लाख ८८ हजार २१८ मतदार आहेत. १ लाख ४० हजार ८९८ पुरुष, तर १ लाख ४७ हजार ३१० महिला आहेत. राजापूर मतदारसंघात २ लाख २६ हजार ०६१ मतदार असून, १ लाख १२ हजार ७८३ पुरुष तर १ लाख २३ हजार २६८ महिला आहेत.
यादीचे पुनर्निरीक्षणामध्ये २० हजार ८७१ नवमतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये तरुण ११ हजार २८१ तरी ९ हजार ५९० तरुणींचा समावेश आहे. २० ते २९ वयोगटात २ लाख ३५ हजार २९० मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटात २ लाख ६० हजार ८०३ मतदार आहेत. ४० ते ४९ वगोगटात २ लाख ७६ हजार १०९ मतदार आहेत. ५० ते ५९ वयोगटामध्ये २ लाख ३२ हजार ८३८ मतदार, ६० ते ६९ वयोगटात १ लाख ६० हजार २३८, ७० ते ७९ वयोगटात ९४ हजार ५८९.८० ते ८९ वयोगटात ३५ हजार ६२५, ९० ते ९० वयोगटात ६ हजार ६१८ तर १०० ते १०९ वयोगटात ४१३, ११० ते ११९ वयोगटात एका मतदाराचा समावेश आहे.
पुरुषांपेक्षा ४५ हजार ३७१ अधिक महिला मतदार
राज्यात रत्नागिरी जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असते. जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदारांपैकी ६ लाख ३० हजार ०१६ पुरुष तर ६ लाख ८४ हजार ३८७ महिला मतदार आहे. म्हणजे ४५ हजार ३७१ जास्त महिला मतदार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 16/Oct/2024









