चिपळूण : सावर्डे-आगवे परिसरात लावणी पूर्णत्वाकडे

सावर्डे : चिपळूण तालुक्याच्या दक्षिणेकडील सावर्डे व आगवे परिसरात पावसाने सातत्य ठेवल्याने रोपलावणीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यंदा या परिसरामध्ये सहाशे हेक्टर जमिनीमध्ये भातशेती होत आहे. मनुष्यबळाचा अभाव, वाढलेला मजीचा दर व पावसाची अनियमितता व इतर कारणाने भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे.

खर्च व उत्पन्न यांचा मेळ घातला तर शेती परवडत नाही त्यामुळे नवीन पिढी या व्यवसायामध्ये येण्यास धजत नसल्याचे चित्र या भागामध्ये आहे. घरचे धान्य असावे, या हेतूने बहुतांश शेतकरी जेवढी शक्य आहे तेवढीच शेती करत आहेत. वरकस जमिनीमध्ये नाचणी व वरीची पिके घेतली जात आहेत त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे. यंदा पावसाने आपली पारंपरिक वेळ न पाळता अपेक्षेपेक्षा लवकर आगमन केल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सामान्यतः जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा जोरदार पाऊस यावर्षी मेच्या मध्यावरच बरसला. पावसाच्या या अचानक सुरवातीमुळे काही शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करता आली नाही. काही ठिकाणी भाजावळही झाली नाही.

भातरोपासाठी तरवेसुद्धा टाकता आले नाहीत. काही ठिकाणी भातरोपांसाठी तरवे पावसातच घाईघाईने टाकावे लागले. विशेषतः सावर्डे, आगवे, असुर्डे परिसरात काही ठिकाणी शेतजमीन अद्याप तयार नसतानाच पावसामुळे ती चिखलात बदलली आहे. यंदाचा लवकर पाऊस काही बाबतीत फायद्याचा वाटत असला तरी शेतकऱ्यांच्या नियोजनात व्यत्यय आला आहे. आधीच खत, बियाणे व मजुरीचे दर वाढलेले असताना काही ठिकाणी बियाणे योग्य रूजलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी क्षेत्रातच रोप लावणी करावी लागत आहे. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. पावसाचे वेळेआधी आगमन हे हवामानातील बदलाचे लक्षण असल्याचे काही कृषीतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यंदाचा शेती हंगाम नेमका कसा जाईल, याबाबत शेतकरी अजूनही साशंक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 05/Jul/2025