सावर्डे : शाळांमध्ये शिपाई नसल्यामुळे सर्व कामे विद्यार्थ्यांनाच करावी लागतात. ग्रामीण भागांतील शाळा चालकांनासुद्धा स्वखर्चाने शिपाई भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिक्षणाचे अवमूल्यन रोखायचे असेल, तर शाळांमध्ये पूर्ण वेळ शिपाई हे पद भरण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली तसेच त्यांनी शाळांमधील समस्यांचा पाढा वाचतानाच शिपायांना देत असलेल्या १५ हजार रुपये मानधनात वाढ करा, अशीही सूचना केली.
अनेक प्राथमिक शाळांमध्ये एक हजारहून अधिक पटसंख्या आहे. त्या ठिकाणी लेखनिक मिळणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २८ जानेवारी २०१९ला जो आकृतिबंध आला त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी वरिष्ठ लिपिक विद्यार्थिसंख्येच्या सुधारित नियमात अतिरिक्त ठरत आहेत. अनेक वरिष्ठ लिपिक हे वयाची ५५ वर्षे उलटून गेलेले आहेत. या स्थितीत त्यांना अतिरिक्त ठरवणं योग्य नाही. अशा वरिष्ठ लिपिकांना त्याच ठिकाणी सेवा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हे विषय रास्त आहेत. संबंधित आमदारांसोबत बैठक घेऊन या बाबतीत काय निर्णय घेता येईल, ते ठरवू असे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 05/Jul/2025














