सावर्डे, आगवेत १२ हेक्टरांवर फळ लागवड : कृषी सहायक रेश्मा पाकळे

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे व आगवे सजातील गावामधून रब्बी आणि खरीप हंगामात पारंपरिक पिकांसोबत आता फळझाड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदा दोन्ही सजांमध्ये २५ हेक्टर फळझाड लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरीही आजअखेर १२ हेक्टर जमिनीत फळझाड लागवड केली आहे. आणखी तीन हेक्टरांवर लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती कृषी सहायक रेश्मा पाकळे यांनी दिली.

सावर्डे व आगवे परिसरातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू, नारळ, चिकू, सीताफळ, अंजीर, कोकम, खैर आणि जांभूळसारख्या फळझाडांची लागवड हाती घेतली असून, त्यामुळे हे परिसरात फळबागांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीची नवी दिशा म्हणून फळबागेचा पर्याय स्वीकारला आहे. विशेषतः मृदसुधारणा, शाश्वत व सिंचन सुविधा व कृषी खात्याच्या योजना यामुळे फळझाड लागवडीला चालना मिळाली आहे.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानित रोपांचे वाटप, प्रशिक्षण शिबिरे व मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने लागवड करता येत आहे. याबाबत कृषी सहायक पाकळे म्हणाल्या, ‘फळझाडांची लागवड केल्यास दीर्घकाळ उत्पन्न मिळू शकते. या परिसरातील हवामान व मृदा फळबाग लागवडीस पोषक असून, शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

या परिसरातील हवामान व मृदा फळबाग लागवडीस पोषक असून, शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

आगवे सजातील आगवे, मांडकी, दहिवली बुद्रुक, दहिवलीखुर्द तर सावर्डे सजातील सावर्डे, सावर्डे कासारवाडी, सावर्डेखुर्द, कोंडमळा आदी गावातून आंबा, काजू, कोकम, खैर, साग आदी झाडांची लागवड सुरू आहे. पंचवीस हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट असले, तरी येथील जमिनीच्या सात-बारावर अनेक नावे असल्यामुळे या जमिनी शासकीय योजनेत बसवताना अडचणी येतात. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यास अडचणी येत आहेत.

मृग व आषाढ महिन्यांतील पावसाचे प्रमाण लक्षात घेता सद्यःस्थितीत लागवडीस अनुकूल हवामान असल्याने फळझाडांची मुळे भुसभुशीत मातीत लवकर रूजतात. त्यामुळे कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना या काळात लागवड करण्याचे आवाहन केले आहे.

खरिपातील ६५ टक्के लावण्या पूर्ण
सावर्डे व आगवे परिसरात खरिपातील ६५ टक्के रोप लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. मोसमी पावसाची सुरुवात लवकर झाल्यामुळे पेरणीची कामे वेळेत करता आली नाहीत. त्यामुळे रोप लावणीच्या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. सावर्डे परिसरात २४० हेक्टर जमिनीत भात व नाचणी या पिकांची लागवड झाली आहे तरीही आगवे परिसरात ३४० हेक्टरमध्ये भात व नाचणीची पिके घेतली जात आहेत. या परिसरात विविध कार्यकारी सोसायटीमधून ५० टन युरिया खतांचा पुरवठा केला आहे, असे पाकळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 05/Jul/2025