लांजातील ‘त्या’ फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई नको : रवींद्र डोळस

लांजा : ज्यांची अधिकृत रजिस्ट्रर हॉकर्स संघटना आहे आणि जे लांजा नगरपंचायतीची २० रुपयांची पावती दररोज फाडतात, अशा छोट्या-मोठ्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करू नका. त्यांच्या पोटावर मारू नका. वरिष्ठांशी चर्चा करून योग्य असा मार्ग काढा, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी घेत या विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गालगत उभारण्यात आलेली बांधकामे, अतिक्रमणे हटवण्यास गुरुवारी (ता. ३) सुरुवात झाली.

गुरुवारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी सहकारी पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र कुलकर्णी, पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना रवींद्र डोळस म्हणाले, महामार्ग चौपदरीकरण आणि त्यासंदर्भातील अतिक्रमण ज्यांनी केले आहे, अशांवरील कारवाई केली जात आहे त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. जे विक्रेते रस्त्यावर बसतात, टोपली घेऊन बसतात, ज्यांच्या हातगाड्या आहेत. त्यांची अधिकृत रजिस्ट्रर संघटना आहे.

यातील काही विक्रेत्यांना नगरपंचायतीने दहा ते वीस हजार रुपयांचे कर्जदेखील दिली आहे. ज्यांचा तुम्हाला त्रास होत नाही, ज्या पिलरचे काम सुरू होते तेथून ते दुसरीकडे जातात. अशा छोट्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी रवींद्र डोळस यांनी केली. चर्चेवेळी तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश राणे, उपतालुकाप्रमुख संजय नवाथे, युवासेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, शिवसेना शहरप्रमुख मोहन तोडकरी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 05/Jul/2025