खेड : खेड रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक चोरीची घटना ५ रोजी पहाटे अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्र. १२६२०) मधील कोच क्र. ५३ आसन क्र. ६० वर प्रवास करत असलेल्या एका महिला प्रवाशाच्या हँडबॅगमधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ८९ हजार ४१० रुपयांचे मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल झाली आहे.
या घटनेतील महिला प्रवासी रत्नागिरीहून खेडकडे झोपेत प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेत तिची हँडबॅग चोरली. बॅगेतील दागिने चोरल्यानंतर चोरट्याने बॅग ट्रेनमधील शौचालयात टाकून दिली. चोरीस गेलेल्या ऐवजात १ लाख ८३ हजार ४२१ रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे लक्ष्मीचे पैडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजारांची ७ ग्रॅमची सोन्याची चैन, ४३ हजार ७१९ रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची अंगठी आणि २ हजार रोख रक्कम यांचा समावेश आहे. या घटनेनंतर महिला प्रवाशाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 07/Jul/2025














