रत्नागिरी : भाविकांच्या गर्दीत श्रीदेव भैरीची आषाढ दशमीची पहिली ग्रामप्रदक्षिणा

रत्नागिरी : भाविकांच्या गर्दीत आणि अत्यंत उत्साही वातावरणात, पावसाच्या सरींमध्ये ग्रामदैवत श्री देव भैरीची आषाढ दशमीची पहिली ग्रामप्रदक्षिणा झाली. भैरीबावाने मानाच्या घरी सहाणेवर आणि ठरलेल्या मार्गाने जात ग्रामस्थांचे उलपे घेतले. भैरीचरणी लीन होण्याकरिता भाविकांची मार्गावर सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली.

ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत श्री देव भैरीची पालखी सकाळी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर आली. त्या वेळी भाविकांनी भैरी नावाचा गजर केला. त्यानंतर मंदिरातून पालखी खालची आळीमार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भवन, टिळकआळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत (खोत) यांच्याकडे थांबली. पुढे जोशी पाळंदमार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबली. वाटेत अनेक ठिकाणी उलपे घेण्यासाठी पालखी थांबत होती. त्यानंतर फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंडमधील सहाणेवर पालखी खांबली. अठराहाताच्या गणपती मंदिरमार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखलेनाका, मारुती आळी येथे आली. तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारुतीआळीतून पऱ्याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठल मंदिरमार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळीमार्गे रात्री श्री देव भैरी मंदिरामध्ये पालखी पोहोचली. गाऱ्हाणे होऊन ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता झाली. या उत्सवात बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ, भाविक आनंदाने सहभागी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 07/Jul/2025