खेड : ओझरवाडीतील ओढ्यात वासरू गेले वाहून

खेड : तालुक्यातील देवघर व हुंबरी गावांच्या मध्यभागी वसलेली ओझर खोऱ्यातील ओझरवाडी ही वाडी स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनंतरही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ता आणि फुटब्रीजसारख्या अत्यावश्यक गरजांची प्रतीक्षा अद्यापही ग्रामस्थ करत आहेत, या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात ओझरवाडीतील स्थानिक बबन पवार यांच्या चार वासरे ओझर ओढा पार करत असताना वाहून जाण्याची घटना घडली. यात तीन वासरे ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता वाचवली, मात्र एक वासरू पाण्यात वाहून गेले.

या दुर्घटनेने संपूर्ण ओझरवाडी हादरली असून, पावसाळा सुरु झाल्यापासून ग्रामस्थ व त्यांची पाळीव जनावरे जीव मुठीत धरून ओढा पार करत असल्याचे विदारक वास्तव पुन्हा समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओझर ओढ्यावर फुटब्रिज बांधण्याची तसेच वाडीला मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या मार्गाची मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मायबाप सरकार अजून किती बळी घेणार? असा संतप्त सवाल करत ओझरवाडीतील नागरिकांनी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अशा दुर्लक्षित वाड्यांच्या समस्या केव्हा सुटणार, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 07/Jul/2025