लांजा : बनावट ऑनलाईन अॅपचा वापर करून अनोळख्या व्यक्तीने लांजा शहरातील एका मोबाईल विक्रेत्याची ३६ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. याबाबत लांजा पोलिसात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची तक्रार प्रकाश विद्यानंद शर्मा (वय ३५, रा. बावधनकर चाळ, लांजा) यांनी पोलिसात दिली आहे. प्रकाश यांचे शहरात राजदीप मोबाईल पॉईंट या नावाचे मोबाईल विक्री दुरुस्तीचे दुकान आहे. ८ जूनला दुपारी साडे बाराच्या सुमारास एक व्यक्ती शर्मा यांच्या दुकानात आली आणि मला मोबाईल खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने ३६ हजार ९९९ रुपयांचा मोबाईल खरेदी केला. मोबाईलचे पैसे फोन-पे द्वारे करतो असे सांगितले.
त्याने अॅपद्वारे मोबाईलचे पैसे दिल्याचे दुकानदार शर्मा यांना सांगितले. मात्र पैसे न आल्यामुळे शर्मा यांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असे सांगितले. काही वेळाने पैसा जमा होतील, असे सांगून ती व्यक्ती तिथून गायब झाली. मात्र काही वेळानंतरही पैसे जमा न झाल्यामुळे शर्मा यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र काही ना काही कारण सांगून त्याने टोलवाटोलवी केली. काही कालावधीनंतर त्या व्यक्तीचा मोबाईल बंद लागत होता. त्यामुळे शर्मा यांनी शुक्रवारी (ता. ४) पोलिसात तक्रार दाखल केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 07/Jul/2025














