हातखंबा झरेवाडी फाट्याजवळ दुचाकीची ट्रकला धडक; स्वाराविरोधात गुन्हा

रत्नागिरी : दुचाकी बेदरकारपणे चालवून समोरुन येणार्‍या ट्रकला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सकाळी 10 वा.सुमारास हातखंबा झरेवाडी फाट्याजवळ घडली होती.

पियुष प्रेमकुमार भारती (18, रा.खेडशी गयाळवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, 28 जून रोजी पियुष भारती हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एवाय- 0286) वरुन सोबत ॠषीकेश शिवराम बावदाने (रा.तळेकांटे, संगमेश्वर) याला सोबत घेउन हातखंबा ते माचाळ लांजा असा जात होता. त्याठिकाणचा रस्ता हा वळणाचा आहे हे माहित असूनही त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकी भरधाव वेगाने चालवली. त्यावेळी आपल्या पुढील वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने समोरुन येणारा ट्रक (जीजे -03-बीव्ही- 0108) ला धडक देत अपघात केला. यात दोघांनाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या होत्या तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 281,125,(अ),125(ब),मोटार वाहन कायदा कलम 184,129/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 07-07-2025