खेड : सह्याद्रीच्या कडेकपारीतून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाची अवस्था बिकट झाली असून ३ ठिकाणी दरडी कोसळण्यासह दरीकडील भाग खचण्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने निधी देणे आवश्यक आहे. सध्या हा घाट धोकादायक बनला असून पावसाळ्याचे पुढील दोन महिने वाहतुकीसाठी त्रासदायक ठरणार आहेत.
दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाची ओळख आहे. सह्याद्रीचा कातळ फोडून त्यातून दोन जिल्ह्यांच्या सीमा एकत्र जोडण्याचा प्रशासनाने केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. परंतु या घाटाच्या निर्मितीनंतर पावसाळ्यात सतत नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या रघुवीर घाटाला पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पसंती मिळते. रघुवीर घाट. १० किमीचा असून या मार्गावर ठिकाणे अत्यंत धोक्याची तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने हा घाट सध्या तरी पावसाळा कालावधीत डेजर झोन मध्येच आहे.
समुद्रसपाटीपासून ४ हजार फुटपेक्षा उंच असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शहराशी असलेला संपर्क तुटतो. मागील आठवडयात पडलेल्या मुसळधार पावसाने सलग दोनवेळा घाटात दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीत खंड पडलेला होता. दरड कोसळण्याच्या भितीबरोबरच आता नवीन संकट या मार्गावर आ वासून आहे. दरड कोसळलेल्या भागात ३ ठिकाणी दरीकडील बाजूचा रस्ता खचत आहे. रस्त्याच्या खाली बाजूपट्टीची माती वाहून गेली आहे. त्यामुळे रस्त्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.
घाटाची स्थिती विदारक
खोपी-शिरगावच्या डोंगर माध्यावरील या घाटातील उखडलेले असून रेलींगचीही दुरवस्था झाली आहे. या घाटात अनेक प्रकारच्या वनस्पतीबरोबरच पावसाळ्यात लाल दुर्मिळ खेकडे, धबधबे असे निसर्गाच्या विविधतेने नटलेला हा घाट सध्या दुलक्षितच आहे. दरवर्षी डागडुजीच्या नावाखाली रस्त्याचे डांबरीकरण केले जाते. मात्र पावसळ्यात ते कोसळणाऱ्या दरडीमुळे वाहून जाते. त्यामुळे घाटाची स्थिती विदारक झाली आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आणि नागमोडी वळणे असलेला हा घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतो. परंतु दरवर्षी धोकादायक दरडी कोसळल्याने आमच्या कांदाटी खोऱ्याकडे जाणारा रस्ता बंद होतो. यामुळे धोकादायक दरडी काढून आवश्यक ठिकाणी डागडुजी करणे गरजेचे आहे. – सदानंद मोरे, ग्रामस्थ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 07/Jul/2025









