खेड : गोळीबार मैदानानजीक दुचाकीची ट्रकला मागून धडक; स्वार जखमी

खेड : खेड भरणे मार्गावर गोळीबार मैदानानजीक ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बैकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन खेडहून भरणेकडे जात होता. त्याचवेळी खेडहून भरणेच्या दिशेने एक ट्रक जात होता. दुचाकी भरधाव असल्यामुळे नियंत्रण राहिले नाही आणि दुचाकी ट्रकला मागून धडकली.

या धडकेत दुचाकीस्वार ट्रक च्या मागील भागात अडकल्याने काही अंतर ट्रक सोबत फरफटत गेला. या अपघातात अभिषेक बैकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर स्थानिक वाहनचालकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारार्थ इतरत्र हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 07/Jul/2025