माखजन : अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी किंबहुना १४ ऑक्टोबर २०२४ च्या टप्पा वाढीच्या शासन निर्णयाच्या कार्यवाहीसाठी, निधी तरतुदींसाठी ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याच मागणीला राज्यातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा, शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे.
या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यानेही लिखित पाठिंबा जाहीर केला आहे. नुसता पाठिंबा न देता संघटनेतर्फे ११ जुलै रोजी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करत संप पुकारला आहे. यामुळे सध्या शासन अडचणीत सापडले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर यांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पत्रात नमूद केल्या प्रमाणे दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे अंशतः अनुदानित शाळांना निधी ची तरतूद करून टप्पा वाढ लागू करावी. दि. १५ मार्च २०२४ चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून, मागील २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असे यासंबंधिच्या पत्रात म्हटले आहे.
शिक्षक भरती पोर्टल द्वारे वर्षातून दोनदा करण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचारी याना मान्यता देण्यात यावी. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा एकदिवसीय संप केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 07/Jul/2025














