खेड : रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे ओळख निर्माण केलेले विष्णू गिम्हवणेकर यांची लोटे महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्र येथे पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नेमणुकीनंतर लोटे परिसरासह जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस खात्यातील आपली सेवा सामाजिक जाणीवेने पार पाडणाऱ्या गिम्हवणेकर यांनी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी कायदा-सुव्यवस्थेसोबतच मानवी मूल्यांची जपणूक करत अनेक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांना पदोन्नती प्राप्त झाली असून, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.
विष्णू गिम्हवणेकर यांना “वर्दीतला माणूस” म्हणून ओळखले जाते. त्यांनी केवळ अधिकृत जबाबदाऱ्या नव्हे, तर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अपघात, आपत्ती अशा घटनांमध्ये त्यांनी वेळेवर मदतीचा हात पुढे करत अनेकांचे जीव वाचवले आहेत.
खेड परिसरातील भरणे नाका येथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या महाकाली ट्रॅव्हल्स अपघात प्रकरणातील त्यांचे धैर्य आणि तत्परता आजही स्थानिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या योग्य निर्णयक्षमतेमुळे त्या अपघातातील अनेकांना वेळेवर मदत मिळाली.
लोटे येथे नव्याने रुजू झाल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, व नागरिकांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांची ही नियुक्ती परिसरात अधिक सुरक्षितता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विष्णू गिम्हवणेकर यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 07/Jul/2025














