नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांसंदर्भात तयार केलेल्या एक्झिट पोल मागे एक कारस्थान होते असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी थेट वक्तव्य केेले नाही. मात्र चुकीच्या एक्झिट पोलचे समर्थन करण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला, असे विधान त्यांनी केले.
एक्झिट पोलविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
राजीवकुमार म्हणाले की, मतदान झाल्यानंतर साधारणपणे तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया संपुष्टात येते. मतदान संध्याकाळी ६ वाजता संपते. त्यानंतर जाहीर होणारे एक्झिट पोल तयार करण्यासाठी कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येत नाही. त्या पोलमुळे लोक विशिष्ट अपेक्षा मनात धरून बसतात. त्या पूर्ण न झाल्यास सर्व गोष्टींचा विपर्यास होतो.
ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीप्रसंगी निवडणूक आयोगाने पहिला कल सकाळी ९.३०ला जाहीर केला; पण त्याच्या आधीच सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक निकालांबाबतचे आडाखे झळकविण्यात येत होते. याची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारची विसंगत माहिती प्रसारित केल्यामुळे काही वेळेस गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अपेक्षा व वास्तव यांच्यातील फरकामुळे कधीकधी निराशा येऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यावर विचारमंथन व्हायला हवे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख निवडणुकीच्या नियमांनुसार पटविली जाईल. तसेच त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा योग्य आदर राखला जाईल, असे राजीवकुमार म्हणाले. हिजाब परिधान केलेल्या महिलांशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या वादांबाबत त्यांनी हे वक्तव्य केले.
प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण करावे’
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, एक्झिट पोलमुळे वस्तुस्थितीचा विपर्यास होतो. त्याविषयी प्रसारमाध्यमे विशेषत: इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक्झिट पोल यावर निवडणूक आयोगाचे नियंत्रण नाही. त्यासाठी वेगळी संस्था अस्तित्वात आहे.
‘शहरातील कमी मतदान ही चिंतेची बाब’
शहरी भागांमध्ये तुलनेने कमी मतदान होते. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम होतो. त्याबद्दल राजीवकुमार यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तुलनेने कमी मतदान होते. त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले आहे. मतदारांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आठवड्याच्या अखेरीच्या सुट्यांना जोडून मतदानाचा दिवस आल्यास या सर्व दिवशी सहलीला जाण्याची मानसिकता शहरी मतदारांमध्ये वाढीस लागली आहे. त्याबद्दल राजीवकुमार यांनी चिंता व्यक्त केली.
‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’
– हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधक करत आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.’
– जम्मू-काश्मीर निवडणुकांबाबत ते म्हणाले की, ‘जमुरियत के जश्न में आपकी शिरकत, दुनिया देखेगी नापाक इरादों के शिकस्त की कहानी’ असा शेर म्हटला.
– लोकसभेवेळही राजीवकुमार यांनी ‘अधुरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, वफा खुद से नहीं होती, खता इव्हीएम की कहते हो, और बाद में जब परिणाम आता है तो उसपे कायम भी नहीं रहते’ असे म्हटले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 16-10-2024