रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची सुमारे ९०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाला पालकांसह लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून कसरत करूनही यंदाच्या वर्षी ग्रामीण भागातील ११ शाळा पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचबरोबर शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. तरीही खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारा आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो. सध्या शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेली आहे.
दरवर्षी पटसंख्येत घट होत चालल्याने पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना सतत आटापिटा करावा लागतो. पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याची भीती सतत जाणवत असते. गतवर्षी पटसंख्येच्या नावाखाली काही शाळा बंद करून तेथील मुलांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करून त्या बंद करण्यात आल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळांमधील घसरलेली पटसंख्या ही शिक्षकांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.
वाढलेल्या स्थलांतराचा पटसंख्येवर परिणाम
ग्रामीण भागात रोजगाराच्या, आरोग्याच्या सुविधा नसल्याने ग्रामीण लोकांचा शहराकडे ओढा, वाढलेले स्थलांतर, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला ओढा, यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होऊन त्या दरवर्षी बंद होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 07/Jul/2025














