राजापुरात सलोख्याचा नवा अध्याय : पोलीस अधीक्षकांनी उचलली पालखी, दिला ताझियाला खांदा!

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात यंदाची आषाढी एकादशी आणि मोहरम सण अभूतपूर्व शांतता आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पार पडले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि पवित्र वातावरणात हे दोन्ही सोहळे साजरे केले, ज्यामुळे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण झाला आहे.

या वर्षीच्या सणांमध्ये अनेक लक्षवेधी गोष्टी घडल्या. राजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच आषाढी एकादशीची पालखी पोलिसांनी उचलून दिंडीची सुरुवात केली. हा क्षण धार्मिक ऐक्याचा एक अनोखा संदेश देऊन गेला. विशेष म्हणजे, याच राजापुरातून निघणाऱ्या मोहरमच्या मिरवणुकीत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सहभाग घेतला आणि पवित्र ताझियाला खांदा दिला. पोलीस अधीक्षकांच्या या कृतीतून हिंदू-मुस्लिमांनी धार्मिक सलोखा राखावा आणि एकमेकांच्या सणांचा, परंपरांचा आदर करावा, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

पुंडलिक मंदिरात नदीतील गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांना राजापूरच्या जनतेने आज प्रथमच पाहिले. दोन्ही धर्मीयांच्या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहावे आणि येणारे सर्व सण खेळीमेळीच्या वातावरणात साजरे व्हावेत, हाच संदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः जातीनिशी राजापुरात उपस्थित होते. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे राजापूरमध्ये धार्मिक सलोख्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 07-07-2025