महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीचा ग्राहकांना मोठा फटका : व्यवसाय आणि सौर ऊर्जा उद्योगासमोरील आव्हाने वाढणार!

रत्नागिरी : महावितरणने प्रस्तावित केलेल्या नवीन वीज दरवाढीमुळे राज्यातील सर्वसामान्य ग्राहक, व्यावसायिक आणि सौर ऊर्जा क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या दरवाढीला सर्वच स्तरांतून तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत, अन्यथा अनेक व्यवसायांसमोर मोठे संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे.

लघु उद्योजक आणि कृषी पंपांना दरवाढीचा शॉक
सध्या २७ एचपी (HP) पर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांना ५०० रुपये इतका स्थिर आकार लागू आहे. मात्र, नवीन प्रस्तावानुसार या ग्राहकांना ‘टाइम ऑफ डे’ (ToD) बिलिंगमध्ये समाविष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे स्थिर आकार तब्बल ४,००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने, या ग्राहकांचे वीज बिल ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. याचा थेट परिणाम कृषी पंपधारक आणि लहान उद्योजकांवर होणार आहे.

वाणिज्य ग्राहकांना ‘पीक अवर्स’चा भुर्दंड
२०० एचपीपर्यंत वाणिज्य वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी (उदा. बँका, कार्यालये, हॉटेल्स, रिसॉर्ट्स) ‘टाइम ऑफ डे’ (ToD) बिलिंगमधील ‘पीक अवर्स’ (Peak Hours) वाढवण्यात आले आहेत. पूर्वी हे पीक अवर्स सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत (४ तास) होते, ते आता सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत (एकूण ८ तास) करण्यात आले आहेत. याचा अर्थ, विजेचा वापर तेवढाच राहिला तरी, दर वाढल्यामुळे बिल किमान २५ टक्क्यांपर्यंत वाढेल. विशेषतः हॉटेल्स आणि लॉजसारख्या व्यवसायांचे कामकाज सायंकाळी ५ नंतरच सुरू होते. त्यामुळे, वापर न वाढताही बिल वाढणार असल्याने हे व्यवसाय करणे कठीण होईल, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाला हॉटेल व्यावसायिकांनी तीव्र विरोध करणे गरजेचे आहे.

सौर ऊर्जा उद्योगासाठी धोक्याची घंटा
सौर ऊर्जा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही दरवाढ धोक्याची घंटा घेऊन आली आहे. नवीन नियमांनुसार, आता फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी सौर ऊर्जेचा वापर करता येणार आहे. या वेळेतील वीज वापरावर थोडी सवलत देण्याचा प्रस्ताव असला तरी, यामुळे ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्प लावूनही अपेक्षित बचत मिळणार नाही. परिणामी, गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी वाढेल आणि ग्राहक सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याकडे आकर्षित होणार नाहीत. यामुळे सौर ऊर्जा व्यवसाय मोठ्या संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, प्रत्येक व्यावसायिक आणि संबंधित संघटनांनी एकत्र येऊन या प्रस्तावित दरवाढीला तीव्र विरोध करणे आणि हा निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 07-07-2025