राजापूर : राजापूर शहरातील लॅव्हीश अपार्टमेंटमध्ये शुक्रवार, ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० च्या दरम्यान दिवसाढवळ्या एका धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने संतोष सुपडा भामद्रे यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याचे रहिवासी असलेले आणि सध्या राजापूर येथील लॅव्हीश रेसिडेन्सीमधील रूम नंबर ०११ मध्ये राहणारे संतोष सुपडा भामद्रे (वय ४१) यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या रूमच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.
चोरट्याने देवघरातील कपाटात आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेली ९ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे राजापूर शहरात, विशेषतः अपार्टमेंट संस्कृती असलेल्या भागात, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे (गु.र.नं. १२८/२०२५). घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी यावर लवकरात लवकर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 07-07-2025














