रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 6 जुलैपर्यंत 10 हजार 973.86 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 1,213.32 इतका पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे.
यंदा पावसाने लवकरच आगमन केल्यामुळे बळीराजा खूष होवून खरीप पेरण्यासाठी नागरणी करुन त्यापाठोपाठ पेरण्याही केल्या. जिल्ह्यात भात, नाचणीसह विविध पिकांच्या 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 1 जून ते 6 जुलै पर्यंत 10973.86 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाऊस आणखी दमदार पडला असून जूनबरोबरच जुलै महिना कोकणासाठी लकी ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कोकणातील शेतकर्यांकडून भात लागवडीसाठी लगबग सुरू आहे. भर पावसात शेतकरी, मजूर हे भातांची लागवड करीत आहेत. काही तालुक्यातील भात लागवड पूर्ण झाली आहे तर काहींची बाकी असून लगबग सुरू आहे. लवकरच भात लावणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 07-07-2025














