रत्नागिरी : गेली तीन वर्षे बंद असलेला खेड न. प. दवाखाना सुरू करण्याबाबत आणि खेड रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता, भरणानाका ते डेंटल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यांचे निकृष्ट काम झाल्या विरोधात खेड येथील मंगेश मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
यातीनही प्रश्नांसाठी मागील तीन वर्षांत आठवेळा आमरण उपोषण करण्याची वेळ प्रशासनाने आणली असल्याचे मंगेश मोरे यांनी सांगितले. खेड न.प.चा दवाखाना सुरू करण्याबाबत १ मे रोजी आमरण उपोषण पुकारले होते. त्यावेळी न.प. प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगितले होते; मात्र अद्याप हा दवाखाना सुरू झालेला नाही. याचवेळ भरणानाका ते डेंटल कॉलेजपर्यंतचा रस्ता तात्पुरते भरण्यात आले. परंतु हा रस्ता चांगल्या पद्धतीने करावा यासाठीही याचवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
पहिल्याच पावसात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खेड रेल्वेस्थानक दरम्यानच्या रस्त्यात मोठे खड्डे पडले असून याविषयी २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते. हे कामही निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे रेल्वेस्टेशन व ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांना, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लोकशाही मार्गाने आपण हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. मंगेश मोरे यांच्यासोबत गणेश खेडेकर, प्रशांत बनप, शुभम पवार, साहील नलावडे, सुहास दिवाकर हेही उपोषणस्थळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 08/Jul/2025














