‘मिशन शक्ती’ योजनेंतर्गत कोकणातील जिल्ह्यात ५० पाळणाघरे

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन शक्ती’ योजनेअंतर्गत पाळणाघर योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कोकणातील जिल्ह्यात प्राधान्याने शहरी आणि निमशहरी भगात ५० पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत.

त्यामध्ये पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एका पदाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना राबवण्यात येत होती. मात्र केंद्र सरकारने या योजनेचे राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये रुपांतर करून एकात्मिक बालविकास सेवा योजनेत त्याचा समावेश केला.

त्यानुसार पाळणाघर योजनेत प्रति पाळणाघर वार्षिक खर्च ३ लाख ३६ हजार ६०० रुपये आहे. त्यात पाळणाघरातील अंगणवाडी सेविका यांना १ हजार ५०० रुपये भत्ता, अंगणवाडी मदतनीस यांना ७५० रुपये भत्ता, पाळणाघर सेविका यांना ५ हजार ५०० रुपये, पाळणाघर मदतनीस यांना ३ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

तसेच पूर्वशालेय घटक संच, पोषण आहार, औषधे संच, खेळणी दिली जाणार आहेत. पाळणाघर भाड्यासाठी शहरी भागासाठी १२ हजार रुपये, तर निमशहरी भागासाठी ८ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. पाळणाघर उभारणीसाठी एकवेळ ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 16/Oct/2024