चिपळूण शहरातील प्रभात रोड खड्डेमय

चिपळूण : शहरातील प्रभात रोडची सध्या चाळण झाली आहे. प्रभात रोडच्या मुंबई-गोवा महामार्गापासून ते नारायण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. चिखल-पाण्याने खड्डे भरून गेले आहेत. येथून जाणाऱ्या प्रत्येकाला रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच पाहावे लागत आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावर सुमारे ४०० मीटर एवढ्या रस्त्याचे डांबरीकरण यावर्षी न झाल्याने येथील रहिवाशांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात खड्ड्यात चिखल पाणी तर पावसाळा गेला की येथील रहिवाशांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीवर साधे पाणी मारण्याचे सौजन्य देखील चिपळूण नगरप रिषद दाखवत नसल्याने येथील नागरिक बेजार झाले आहेत. चिपळूण शहरातील अनेक रस्ते सुधारले पण प्रभात रोडच्या या दुरवस्थेकडे शासनाला व तथाकथित लोक प्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप होत आहे.

पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे चिखल पाणी साचल्याने दिसायला लागल्यावर यामध्ये ग्रीट टाकले जाते व तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु गाड्या जाऊन जाऊन ते सगळं पुन्हा खड्यातून बाहेर येते. पावसाळ्यानंतर या ग्रीटमुळे परिसरात धूळ पसरते. या सर्व बाबींकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 08/Jul/2025