खेड : तालुक्यातील कुळवंडी ग्रामपंचायत येथे हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य रस्ता, शाळा, अंगणवाडी, बालवाडी आणि मंदिरे परिसरात हापूस आंबा, वेंगुर्ला काजू, कोकम, जांभूळ, चिंच, फणस, चिकू, पेरू अशा १०० फळझाडांची लागवड करण्यात आली.
विशेष म्हणजे एक व्यक्ती – एक वृक्ष या संकल्पनेनुसार शंभर नागरिकांनी प्रत्येक झाडाचे पालकत्व स्वीकारून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी उचलली. सरपंच विष्णू निकम यांनी सांगितले की, दरवर्षी १०० फळझाडांची लागवड करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्याचा आणि गाव सुजलाम सुफलाम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये झाडांच्या पालकांना २५% उत्पन्नाचा हिस्सा देण्यात येईल, तर उर्वरित ७५% उत्पन्न ग्रामपंचायतीच्या विकासासाठी वापरले जाईल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच दिलीप निकम, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक संतोष खोपकर, पोलिस पाटील अशोक निकम आदींनी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 08/Jul/2025











