दापोली : दापोली शहरात खुलेआम विक्री होणाऱ्या अमली पदार्थाचा आवाज आता पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. दापोलीतील नागरिकांची हाक आमदार भाई जगताप यांनी ऐकली असून दापोलीतील अमली पदार्थ हा विषय थेट लक्षवेधी म्हणून त्यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे.
जगताप यांनी उपस्थित केलेल्या विषयामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष दापोली तालुक्याकडे वेधले गेले आहे. दापोलीत, गुटखा, गांजा आणि ड्रग्जसारखे अमली पदार्थ सेवन केले जात असून हे पदार्थ अगदी सहज उपलब्धही होत आहेत, असे काही नागरिक चर्चेतून बोलत आहेत. काही परप्रांतीय युवक गांजा कुठे मिळतो, अशी विचारणा करतानादेखील समोर येतात. त्यामुळे या अमली पदार्थाने लोण किती वाढले आहे, याची प्रचिती दापोलिकरांना येत आहे. रात्री ‘रात के मुशाफिरी’ मैदानात बंद टपऱ्यांच्या आडोशाला गल्ली बोळात अगदी राजरोस या अमली पदार्थांचे सेवन करताना अनेकवेळा नागरिकांना दिसतात.
अशावेळी याचा उग्र वासही या ठिकाणी दरवळतो. आमदार भाई जगताप यांनी दापोलीच्या सुसंस्कृतीची आणि पर्यटन तालुक्याची चिंता व्यक्त करून ही लक्षवेधी मांडली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.
अमली पदार्थांचा विळखा रोखण्यासाठी जिल्हा पोलिस पथकाकडून एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. मात्र ते देखील अॅक्टिव्ह दिसत नसल्याने हा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. दापोली मतदारसंघाचे आमदार आणि गृह राज्यमंत्री हे योगेश कदम आहेत. त्यामुळे जगताप यांनी मांडलेली लक्षवेधी हा विषय मोडीत काढण्यासाठी योगेश कदम यांचे समोर हे एक प्रकारे आव्हान आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 08/Jul/2025














