दाभोळे- मालपवाडीदरम्यान जुना महामार्ग पोकलेनमुळे उखडतोय

साखरपा : दाभोळे आणि मालपवाडीदरम्यान महामार्गाच्या कामासाठी वापरात असलेली पोकलेन मशीनची वाहतूक जुन्या महामार्गावरूनच होत असल्यामुळे तो महामार्ग जागोजागी उखडला आहे.

दाभोळे-साखरपादरम्यान मालपवाडी गावानजीक डोंगर खणून महामार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी तीन ते चार पोकलेन मशीन या कामावर नियुक्त आहेत. मातपवाडीदरम्यान असलेला डोंगर फोडला जात आहे. हे काम दिवसभर सुरू असते. संध्याकाळी काम संपले की, ही मशीन दाभोळे येथे आणून ठेवली जातात. सकाळी पुन्हा ही मशीन मालपवाडी येथे नेऊन काम सुरू होते. दाभोळे ते मालपवाडी दरम्यान पोकलेन मशीनची ही जा-ये जुन्या डांबरी महामार्गावरुनच सुरू असते. या ठिकाणी अद्याप नवीन महामार्ग वापरात आलेला असल्यामुळे अन्य वाहतूकही सध्या जुन्याच महामार्गावरून सुरू असते.

पोकलेन मशीनच्या लोखंडी पट्टयामुळे डांबरी महामार्ग जागोजागी उखडला जात आहे. त्याचबरोबर पोकलेन मशीनमध्ये अडकलेली माती वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडून जागोजागी चिखलही होत आहे. त्यामुळे वापरात असलेल्या जुन्या महामार्गाची दैना होत आहे. परिणामी, या ठिकाणाहून प्रवास करणे अन्य वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे
दाभोळे आणि मालपवाडीदरम्यान महामार्गाच्या कामासाठी पोकलेन मशिनची महामार्गावरूनच ये-जा सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट होत आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वेळीच उपाययोजना कराव्यात आणि संभाव्य अपघाताचे धोके टाळावेत अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 08/Jul/2025