मंडणगड : आंबडवे लोणंद महामार्गावरील खड्ड्यात उद्या वृक्षारोपण करण्याचा इशारा

मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंडणगड तालुक्यात निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार हे उपाययोजना करत नसल्याने ९ जुलैला मंडणगड ते म्हाप्रळदरम्यानच्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

या विषयासंदर्भात ७ जुलैला तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, सुभाष सापटे, भावेश लाखण, हसरत खोपटकर, रामचंद्र पारधी यांनी तहसीलदार अक्षय ढाकणे व पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले. मंडणगड ते महाड या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालवणे, कार, अॅम्बुलन्स चालवणे शक्य नाही. त्यामुळे बुधवारी (ता. ९) सकाळी ९ वाजल्यापासून ते संपूर्ण दिवस खड्ड्यांमध्ये झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गाडी चालवणे आता अत्यंत कठीण असून, येथील धोकादायक परिस्थितीवर संबंधितांकडे सातत्याने पाठपुरावा करून कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. तालुकावासियांचे मोठे हाल होत असल्याने रस्त्यावर वृक्षारोपण करणे, हाच पर्याय शिल्लक राहिला आहे. यंदाचे बांधकाम हंगामात प्रशासनाने पूर्ण करण्याचा संकल्प करूनही अपूर्ण राहिलेला हा रस्ता पावसाच्या कालावधीत वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर खड्यामध्ये झाडे लावून पर्यावरणाला साथ देण्याचे काम होईल, या शुद्ध हेतूने हा कार्यक्रम हाती घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 08/Jul/2025