चिपळूण : तिवरे धरण पुनर्बांधणीच्या कामाला अखेर सुरुवात

चिपळूण : पाच वर्षांपूर्वी चिपळुणातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने तब्बल ६२ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीतून धरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. निकम यांच्या हस्ते झाले. पाच वर्षांनंतर या धरणाच्या बांधकामाचे काम आता सुरू होणार असून, तिवरेसह दसपटीतील गावे पाणी टंचाईमुक्त होणार आहेत.

२ जुलै २०१९ मध्ये रात्रीच्यावेळी तिवरे धरण फुटून येथील तिवरे भेंदवाडी पूर्णतः उद्ध्वस्त उद्ध्वस्त झाली. सुमारे २२ लोकांचे बळी गेले व भेंदवाडीतील घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली. यानंतर हाहाकार उडाला. या धरणफुटीनंतर राज्यभरात मोठे पडसाद देखील उमटले. यानंतर आ. शेखर निकम यांनी आमदार झाल्यावर तिवरे धरण नव्याने बांधण्याचा संकल्प केला व सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. ठाकरे सरकारच्या काळात या धरणाच्या बांधकामासाठी तत्त्वतः मंजुरी मिळाली तर आता महायुतीच्या काळात तिवरे धरण बांधकामासाठी सुमारे ६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी धरण बांधले जाणार आहे.

सुरुवातीच्या काळात धरण सिमेंटचे की मातीचे बांधायचे यावरून ग्रामस्थांमध्ये वेगवेगळी मते होती. मात्र, त्यावर यशस्वी तोडगा काढून अखेर आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून या धरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत ६२ कोटी ७४ लाख रुपयांतून हे काम होत आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागअंतर्गत हे काम होणार असून आ. शेखर निकम यांनी तिवरे ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन केले. तसेच याचवेळी लघुपाटबंधारे योजनेंतर्गत रिक्टोली, तिवडी या ठिकाणीही तब्बल ५४ कोटी रुपयांच्या विकासकामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जयंद्रथ खताते, सूर्यकांत खेतले, माजी सभापती पूजा निकम, तिवरेचे मंगेश शिंदे, प्रवीण शिंदे, पांडुरंग शिंदे, विलास शिंदे, भालचंद्र पंचांगणे, उदय ओतारी, स्वप्निल शिंदे, उत्तम शिंदे, पूजा कदम, आदिती देशपांडे, प्रकाश पवार, दिनेश शिंदे व भेंदवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तिवरेवासीयांनी आ. शेखर निकम यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 16/Oct/2024