राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी (कोंडिवळे) येथे जावयानेच सासऱ्यांच्या दुकानातून मोबाईल घेऊन ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दानिश हेमंत काझी (वय २९, रा. वडवली, ता. राजापूर, सध्या रा. वडाळा, मुंबई) याने फिर्यादी जायदा मुनीर काझी आणि त्यांचे पती मुनीर काझी यांच्या मोबाईलमधील फोन पे ॲपद्वारे तब्बल २,५९,०७० रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवून फसवणूक केली आहे.
ही घटना २६ मे २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ ते २९ जून २०२५ रोजी दुपारी ३:५५ च्या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार ७ जुलै २०२५ रोजी रात्री ८:३९ वाजता राजापूर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१६ (२), ३५१ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश काझी हा फिर्यादी जायदा मुनीर काझी यांचा जावई आहे. दानिशने सासऱ्यांच्या दुकानात मोबाईल चार्जर राहिल्याचे सांगून त्यांच्याकडून अमन जनरल स्टोअर्स या दुकानाची चावी मागितली. फिर्यादींनी विश्वासाने चावी दिल्यानंतर दानिशने दुकानात ठेवलेला मोबाईल घेऊन त्याचा गैरवापर केला. त्याने मोबाईलमधील ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे २,५९,०७० रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवून फिर्यादींची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर, त्याने फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जावयानेच केलेल्या या फसवणुकीमुळे नातेसंबंधातील विश्वासाला तडा गेल्याची चर्चा आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 08-07-2025














