चिपळूण : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट रोडवरील करजखांडा येथील एका भातशेतीत डुकराची शिकार करण्याच्या प्रयत्नात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिकारीसाठी केलेल्या गोळीबारातील एक छर्रा जवळच असलेल्या इमारतीच्या खिडकीवर आदळला, ज्यामुळे खिडकीची काच फुटली. ही घटना २९ जून २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रुपेश उल्हास जोगी (पोकों/१३१५) यांनी ७ जुलै २०२५ रोजी पहाटे १:०९ वाजता तक्रार दाखल केली. त्यानुसार, विशाल विजय पवार (रा. पेठमाप, गणेशवाडी, ता. चिपळूण) आणि नितीन धोड होळकर (वय २०, रा. कोडयेमाळ, माळवाडी, ता. चिपळूण) या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३ (५), ३२४ (४) आणि शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल पवार याने नितीन होळकरला सोबत घेऊन, त्याच्या ताब्यातील विनापरवाना बंदुकीने डुकराची शिकार करण्याच्या उद्देशाने एक काडतूस फायर केले. दुर्दैवाने, त्या काडतुसातील एक छर्रा समोर असलेल्या हायलाईफ रेसिडन्सी बिल्डिंगमधील रूम नं. १०१ मध्ये राहणाऱ्या अरशद अशरफ तांबे यांच्या किचनमधील खिडकीला लागला आणि तिची काच फुटली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि त्याचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 08-07-2025














