रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट दिसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचे आदेश आले आहेत. केंद्र शासनाच्या गुप्तचर विभागाकडून तसा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ बंदरे, ४६ लैंडिंग पॉईंटवर पोलिस, कस्टम, तटरक्षक दलाचे विशेष लक्ष आहे. किनारी भागात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत महत्त्वाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना बोटी तपासण्याचे आदेश दिले आहेत.
रात्री रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्रात संशयास्पद बोट दिसली. बोटीतून काही संशयास्पद व्यक्ती उत्तरल्या. हो बोट पाकिस्तानी असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने सुरक्षायंत्रणा सतर्क आहे. त्या भागात नौदल, तटरक्षक दलांकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले; परंतु त्यानंतर ही बोट आणि व्यक्ती कुठे गायब झाली, हे समजू शकले नाही. त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणांनी रायगड ते बाणकोटपर्यंत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरक्षायंत्रणांना तसा संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक घेतली. बैठकीमध्ये पोलिस, तटरक्षक दल, मेरिटाईम बोर्ड, कस्टम आदी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यातील मिरकरवाडा, हर्णे, नाटे, जयगड आदी नऊ बंदरांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले. या बंदरांमध्ये येणाऱ्या नौका, व्यक्तींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चौगुले, जिंदल, फिनोलेक्स या तीन खासगी बंदरांनादेखील याबाबत सूचना केली आहे. त्यांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात सुमारे ४६ लैंडिंग पॉईंट आहेत. या पॉईंटवर पोलिसांनी विशेष आणि हत्यारबंद पोलिस तैनात केले आहेत. किनारी गस्त वाढवली आहे. कोणालाही काही संशयास्पद दिसल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसयंत्रणा किंवा जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे सूचित केले आहे. तटरक्षक दलाचे सहायक आयुक्त कृष्णा यांनी याला दुजोरा दिला. आम्ही सतर्क असून, तपासणी सुरू असल्याचे सांगितले.
केंद्र शासनाच्या गुप्तचर विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार आम्ही सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे. बंदरात येणाऱ्या सर्व बोटींची, व्यक्तींची तपासणी केली जात आहे संदीप भुजबळ, -कॅप्टन, मेरिटाईम बोर्ड, रत्नागिरी.
एमएमबीने तपासणी करावी : जिल्हाधिकारी
सर्व विभागांनी गंभीरपणे अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेऊन, सतर्क राहून कारवाई करावी. महाराष्ट्र मेरिटाईम बोडनि (एमएमबी) संशयित बोटींची तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. नार्को को-ओर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. जिल्हाधिकारी सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, “शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडे प्रलंबित असणारे तडिपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेऊन, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषतः सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे. यावेळी पोलिस अधीक्षक बगाटे यांनी कार्यवाहीबाबत माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 08/Jul/2025














