चिपळूण : आकुसखाँ नगर येथील ग्रामस्थांचा पाणीपट्टीविरोधात निवेदन

चिपळूण : पोफळी ग्रामपंचायतीने आकुसखाँ नगर या महसुली गावातील ग्रामस्थांकडून हुकूमशाही पद्धतीने मागील तीन वर्षाची पाणीपट्टी यावर्षी नियमबाह्यपणे वसूल करण्यासाठी ग्रामस्थांना पावत्या दिल्या आहेत. आधी मोफत पाण्याचे आश्वासन देण्यात आले नंतर तीन वर्षाची पाणीपट्टी एकदम भरण्याची नोटीस बजावण्यात आली. ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाणीपट्टी लादण्यात आली त्या विरोधात काल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन जाचक पाणीपट्टीचा फेरविचार करण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने पाणीपट्टीची रक्कम दुपटीने वाढवली आहे. वास्तविक पाहता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ग्रामपंचायतीने त्या त्या वर्षी पाणीपट्टीच्या पावत्या ग्रामस्थांना पाठवून देणे गरजेचे होते तसेच घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली एकसोबत होणे गरजेचे होते. तसेच पाणीपट्टीची रक्कम वाढवण्यापूर्वी त्या भागातील ग्रामस्थांची स्वतंत्र सभा घेणे गरजेचे होते. तसे ग्रामपंचायतीने केलेले नाही. आकुसखाँ नगर गावातील ९० टक्के लोक कोयना प्रकल्पग्रस्त आहेत. शासनाकडून मोफत पाणी मिळणे गरजेचे असताना पुढाऱ्यांना पाणीयोजनेचा ठेका मिळावा यासाठी पाणीयोजना राबवण्यात आली. योजना राबवताना आम्हाला ग्रॅव्हिटीने मोफत आणि २४ तास पाणी मिळेल, असे सांगण्यात आले होते; मात्र योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरामागे महिना पन्नास रुपये पाणीपट्टी लादण्यात आली. पाणीयोजनेची वर्षातून कधीही होणाऱ्या देखभाल दुरुस्तीसाठी ही लोकवर्गणी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही ती सहन केली. त्यानंतर गावाला अंधारात ठेवून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीयोजना राबवण्यात आली. याही योजनेत अनेक त्रुटी आहेत.

निवडणुका आल्यावर आमच्या गावचा पाणीपुरवठा बंद केला जातो. पाणीयोजनेचे पाईप फुटणे, मीटर जळण्याचे प्रकार घडतात. तोच अनुभव आम्हाला या वेळी सुद्धा येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला विनंती आहे की, शंभर रुपये महिना पाणीपट्टी रद्द करून आम्हाला पन्नास रुपये महिना घरपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच उस्मान सय्यद यांनी निवेदन स्वीकारून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 08/Jul/2025