चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्रच्या प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पाचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडून कौतुक

चिपळूण : पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने चिपळूण शहर आणि परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे संचालक भाऊ काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरमहा सुमारे दहा टन प्लास्टिकचा पुनर्वापर केला जात आहे. यामुळे शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनात मोठे योगदान मिळत आहे, अशी प्रशंसात्मक भावना चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी व्यक्त केली.

जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी भोसले यांनी खेर्डी एमआयडीसीतील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर केंद्राला भेट दिली. त्यांनी केंद्रातील प्रक्रियांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आरोग्य निरीक्षक सुजित जाधवही उपस्थित होते. संचालक भाऊ काटदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७०० नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. नागरिकांनी व्हॉट्सप ग्रुपवर संदेश पाठवल्यानंतर कर्मचारी घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलित करतात. जमा झालेल्या प्लास्टिकचे आठ प्रकारांमध्ये काटेकोर वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर त्याचा पुनर्वापर केला जातो.

वापरलेले प्लास्टिक केवळ साठवून ठेवला जात नाही, तर पर्स, लॅपटॉप बॅग यांसारख्या उपयुक्त वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरले जाते. यासोबतच थर्माकोलचाही पुनर्वापर या केंद्रात करण्यात येतो. पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून दहा लोकांना रोजगाराची संधीही प्राप्त झाली आहे

संस्थेचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारण्यासाठी लवकरच प्लास्टिकपासून दोऱ्या तयार करणारे यंत्र आणण्यात येणार आहे. मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, नागरिकांनी अधिकाधिक प्लास्टिक गोळा करून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडे सुपूर्त करावे, ही एक सामूहीक जबाबदारी मानून कृती केली पाहिजे. या उपक्रमाच्या माध्यमातून चिपळूण शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी ठोस आणि परिणामकारक पाऊले उचलली जात असून, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे हे कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 08/Jul/2025