प्लास्टिकमुक्तीसाठी चिपळुणात रंगणार ‘होम मिनिस्टर’

अडरे : चिपळूण नगर परिषद, सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि ‘नाटक कंपनी, चिपळूण’ यांनी संयुक्तपणे शहरात प्लास्टिकमुक्तीचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून खास महिलांसाठी ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

अभिनेता ओंकार भोजने यांची ‘स्वच्छतादूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या उपस्थितीत चिपळूणमधील शाळा, संस्था, सामाजिक मंडळे यांच्याशी समन्वय साधून प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर महिलांना यात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ ही स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. चिपळूण शहरातील कोणतीही महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकते. महिन्यातून पंधरा दिवस प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलांना विशेष कूपन्स देण्यात येणार आहेत. या कूपन्सच्या आधारे लकी ड्रॉ घेण्यात येईल आणि विजेत्या महिलेला पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत अंतिम विजेता निवडून तिला सोन्याची नथ भेट दिली जाणार आहे.

या स्पर्धेचा उद्देश केवळ प्लास्टिक गोळा करणे नसून, शहरातील महिलांमध्ये पर्यावरणीय भान निर्माण करणे, त्यांच्यातील नेतृत्वगुणास प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे- विशाल भोसले, मुख्याधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 08/Jul/2025