चिपळूण : एमआयडीसीची पाणी पाईपलाईन फुटून नुकसान झालेल्या पेढे येथील कुटुंबांना शासनामार्फत नुकसान भरपाईची एकूण १५ लाख ३२ हजार १० रुपये रकमेचे वाटप करण्यात आले. अवघ्या पाच महिन्यांत मदतीची रक्कम संबंधितांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पेढे गावच्या सरपंच आरूषी शिंदे यांची नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
दि. १४ मे २०२४ रोजी लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन पेढे येथे फुटून लगतच्या घरांना फटाका बसला हेता. यामध्ये अक्षय नथुराम सावरटकर यांचे ७३ हजार रूपये, रोहिणी साळुंखे यांचे ७५ हजार रूपये, ज्योती शिंदे यांचे ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचे, साहिल गांधी यांचे १ लाख ५२ हजार ५०० रुपये, स्मीत गांधी यांचे १ लाख ७५ हजार, जगदीश चिवेलकर यांचे १ लाख ७५ हजार, मानसी चिवेलकर ५५ हजार, राकेश गडदे ३ लाख २२ हजार ७०० रुपये, गौरी गडदे यांचे १ लाख ७६ हजार १४५ रुपये अशा ९ कुटुंबांच्या घरांचे एकूण १५ लाख ३२ हजार १० रुपयांचे नुकसान झाले होते.
शासनाकडून बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पेढे गावच्या सरपंच आरूषी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. तातडीने पंचनामे करून प्रशासन, शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सहा महिन्यातच यश आले. नुकताच राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या चिपळूण दौऱ्यात आयोजित एका कार्यक्रमात ही नुकसान भरपाईची रक्कम संबंधित नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 16/Oct/2024









