रत्नागिरी : येथील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूक-बधिर विद्यालयाच्या ४४ व्या वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त शाळेत एक कार्यक्रम साजरा झाला.
यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. प्रदीप तथा बाबा परुळेकर, प्रमुख पाहुणे जि. प. च्या समाजकल्याण विभागाचे निरीक्षक दीपक आंबवले, संस्था कार्याध्यक्ष ॲड. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, व्यवस्थापक राजाराम पानगले, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी सौ. उषा सुर्वे आदी उपस्थित होते. श्री. रजपूत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. च्या समाजकल्याण विभागाचे निरीक्षक दीपक आंबवले यांनी सांगितले की, दि न्यू एज्युकेशन सोसायटीने दिव्यांगांना घडवणारी ही शाळा उभी केली. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले.दहावी उत्तीर्ण ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण, व्यावसायिक प्रगती करणारे माजी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. मुलांना गणवेश व भेटवस्तू देण्यात आल्या. याबाबत इस्रोला भेट देणारी शाळेची विद्यार्थिनी अनन्या मुरकर हिचेही कौतुक केले. शाळेच्या या प्रगतीचा मला संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार ॲड. परुळेकर यांनी काढले.
या मुलांना घडविण्यासाठी शाळेतील शिक्षक कधीही न कंटाळता या विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात. त्यामुळे ही मुले या शाळेतून बाहेर पडल्यानंतर ही मुले सामान्य माणसांप्रमाणेच काम करत असतात व आहेत, असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. सुमिता भावे यांनी सांगितले. आविष्कार शाळेचे कलाशिक्षक श्री. कांबळे हे आविष्कार शाळेतील कार्यशाळेतील मुलांना घेऊन आले होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विशेष शिक्षक सीमा मुळ्ये यांनी केले. राजकुमार कसबे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 08-07-2025














