रत्नागिरी : साडेपाच वर्षात भरोसा कक्षाने सावरले ५५ टक्के संसार

रत्नागिरी : आधुनिक जीवनशैलीत पती पत्नी दोघेही कमावते असल्याने दोघांचीही स्वतंत्र विचारसरणी होऊ लागली आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याच्या अट्टहासातून कौटुंबिक वाद वाढू लागले आहेत. तसेच विवाहबाह्य संबंध, सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा अधिक रमणे या कारणांमुळे लहानग्यांचा विचार न करता पती पत्नी अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतात. मात्र, अगदी टोकाच्या निर्णयापर्यंत जाणाऱ्या जोडप्यांचे येथील भरोसा कक्षाने संसार सावरले आहेत. गेल्या साडेपाच वर्षात या कक्षात दाखल झालेल्या ४७३ तक्रारींपैकी २५८ तक्रारींमध्ये (५५ टक्के) समुपदेशनाने, मत परिवर्तनाने संसार जोडले आहेत. यात पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे.

येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत महिला आणि मुलींच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यांना न्याय मिळावा, या हेतूने महिला सुरक्षा विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत अत्याचारग्रस्त महिला आणि मुलींना न्याय दिला जातो. त्यामुळे या कक्षात महिला दाद मागण्यासाठी निर्भयपणे येत आहेत. मात्र, या कक्षात आता पुरुषांच्या तक्रारीही दाखल होत आहेत. महिलांच्या समस्यांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता समिती आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला भरोसा कक्ष आणि महिला सुरक्षा समिती यांच्या समन्वयाने महिलांच्या समस्यांचे निराकरण करतानाच वैवाहिक वाद मिटविण्याचे कामही केले जाते. तसेच महिला मुलामुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे मुली आणि महिलांमध्ये जागृती वाढली असून महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

पुरुषांच्याही येतात तक्रारी
अॅड. प्रिया लोवलेकर, अनुराधा ताटके, शामल शेठ, मंगला नाईक या सदस्य आहेत. या समितीसमोर महिलांच नव्हे तर दिव्यांग, बालके तसेच पुरुषांच्याही तक्रारी येतात. गेल्या सहा महिन्यात पुरुषांच्या १६ तक्रारी आल्या असून ७मध्ये कक्षातर्फे समझोता झाला.

येथील भरोसा कक्षात अगदी टोकाचे निर्णय घेतलेल्या तक्रारी दाखल होतात. मात्र, भरोसा कक्षाकडून ते वाद सोडवून त्यांचे संसार जोडण्याचे काम समुपदेशनाच्या साहाय्याने केले जाते. त्यामुळे घटस्फोट टळून त्यांचे संसार जोडले जातात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्यही उद्ध्वस्त होण्यापासून वाचते. या कक्षाने गेल्या सहा महिन्यात ३१ संसार जोडले आहेत. – जयश्री गायकवाड, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

२५८ संसार जोडले
रत्नागिरीतील पोलिस अधीक्षक कार्यालयात भरोसा कक्ष मार्च २०२० पासून कार्यरत आहे. आतापर्यंत साडेपाच वर्षात या कक्षात तब्बल ४७३ महिलांच्या तक्रारी दाखल झाल्या. यापैकी २५८ प्रकरणांमध्ये महिलांच्या समस्या सोडवून समुपदेशनाने पती पत्नीत समझोता करण्यात आला आहे. त्यामुळे विविध महिलांच्या समस्या दूर झाल्या आहेत. तसेच या जोडप्यांचे घटस्फोट टळले असून त्यांचे संसार जोडले गेले आहेत.

भरोसा कक्षात समुपदेशन…..
भरोसा कक्षात सहायक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, उपनिरीक्षक रागिणी सावंत, मधुरा गावडे, हेड कॉन्स्टेबल छाया चौधरी, साक्षी कारेकर, सांची सावंत, शीतल कांबळे या कार्यरत आहेत. दिव्यांग, मानसिक समस्या, कायदेविषयक समस्या आदींसाठी समुपदेशक म्हणून अॅड. प्रिया लोवलेकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अतुल ढगे, बीना कळंबटे, संरक्षण अधिकारी लहू पगाडे आणि सामाजिक कार्यकर्ती स्मृती मोहिते या काम पाहातात.

महिला सुरक्षा समितीत पुरुषांच्याही तक्रारी
जर तात्काळ गुन्हा नोंद केला तर संबंधित महिलांचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते किंवा दाखल झालेल्या फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. अशा प्रसंगी घरगुती, पती-पत्नीमधील वाद निवारण काम महिला सुरक्षा समिती करते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:49 PM 08/Jul/2025