राजापूर : तालुक्यातील पांगरे बुद्रुक या गावात एक शिलाहारकालीन शिलालेख उजेडात आला आहे. या लेखाची शिळा गावातील श्री हरिहरेश्वर मंदिर परिसरात एका ओट्यावर ठेवलेली आहे. या शिलालेखातून राजापूरच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक परिस्थितीची माहिती मिळाली आहे. पांगरे बुद्रक येथील श्री हरीहरेश्वर मंदिराचा पाया शिलाहार राजाने शके १०८२ म्हणजे सन ११६० साली घातल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याचे ऐतिहासिक अधोरेखित झाले आहे.
आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या लेखाचे वाचन पुण्यातील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी केले असून त्यांना अथर्व पिंगळे यांचे सहकार्य मिळाले. शिलालेख अनेक वर्षे उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली आहेत. हा शिलालेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाचा पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा) म्हणजे पाया घातल्याचा उल्लेख असून, तो शिलाहार वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन याचा आहे. तो स्वतःला शिलाहार नरेंद्र, महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे. त्याची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी) येथे राज्य होते. या राजाने मंदिराचा पाया घालून काही जमीन दान केल्याचा यात उल्लेख आहे.
हा शिलालेख उजेडात येण्याच्या कार्यात पत्रकार विनोद पवार, दत्तात्रय शिंदे, गणेश नेर्लेकर, अंजय धनावडे यांचे सहकार्य लाभले असल्याचे इतिहास संशोधक व शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी सांगितले.
शिलालेखातील मजकूर
१. सकु १०८२ विक्रम संव
२. त्सरे पीठिका
अर्थ : शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले, त्यांची माहिती लेखात नाही. मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 08/Jul/2025














