रत्नागिरी, (दि. ८ जुलै) : रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन उपजिल्हाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार बेकायदेशीरपणे गैरहजर राहत असल्याने प्रशासकीय कामांवर गंभीर परिणाम होत आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना वारंवार नोटीस बजावूनही ते कार्यालयात हजर होत नसल्याने, त्यांना रत्नागिरीतून कार्यमुक्त करून अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांकडे सादर केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही उपजिल्हाधिकारी प्रमुख विभागांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचे विभाग थेट जनतेच्या कामांशी संबंधित आहेत. त्यांची सातत्याने गैरहजेरी यामुळे जनतेची अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत, परिणामी नागरिकांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
या गैरहजर उपजिल्हाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली असली तरी, त्यांनी कार्यालयात गैरहजर राहणेच पसंत केले आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक महत्त्वाचे निर्णयही प्रलंबित आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून, १०० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना, जबाबदार अधिकारीच गैरहजर राहत असल्याने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेला हा प्रस्ताव शासनाकडे अद्याप प्रलंबित असल्याने, यावर कधी निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 09-07-2025














