रत्नागिरी : तालुक्यातील वाटद एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात वाटद गावातील ग्रामस्थांची सुनावणी झाली. प्रकल्पाला आमचा विरोध नाही; मात्र काही महत्त्वाच्या बाबींचा लेखी खुलासा शासनाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावात नक्की कोणता प्रकल्प येणार? तो प्रदूषणकारी असणार का? तसेच या प्रकल्पाचा आमच्या स्थानिक ग्रामस्थांना, युवकांना काय फायदा
होणार? अशा काही गोष्टींचा लेखी खुलासा शासनाने करावा, अशी मागणी असलेले निवेदन प्रांताधिकारी जीवन देसाई यांना ग्रामस्थांनी दिले.
वाटद एमआयडीसीसंदर्भात हरकतींवर काल वाटद गावातील ग्रामस्थांची सुनावणी प्रक्रिया झाली. येथील अल्पबचत सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. सकाळी ११च्या सुनावणीसाठी वाटद गावातील हरकती दाखल केल्या. १०३ पैकी ८० ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर होते. यावेळी वाटद गावचे माजी सरपंच एकनाथ सखाराम धनावडे (अप्पा धनावडे) यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे एक निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले. आमच्या गावात नक्की कोणता प्रकल्प होणार, याबाबत आम्हाला लेखी माहिती द्या. गावात कोणताही प्रदूषणकारी प्रकल्प होणार नाही. याची हमी द्या.
भविष्यात आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनी संपादित झाल्यावर आमच्या मुलाबाळांना या प्रकल्पात नोकरी मिळणार का, याबाबतही लेखी द्या. परिसरातील अनेक जमिनींसंदर्भात काही दावे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत, ते लवकर निकाली काढावेत. गेल्या काही वर्षांत झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी व्हावी, प्रकल्पादरम्यान होणारी कुशल-अकुशल कामे इथल्याच स्थानिक कामगारांना मिळावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 09/Jul/2025














