रत्नागिरी : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची आज धरणे

रत्नागिरी : चार श्रमसंहिता आणि पीएफआरडीए कायदा रद्द करणे यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी, जिल्हा परिषद निमसरकारी, सरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे धरणे आंदोलन आज (ता. ९) दुपारी १ ते ३ या कालावधीत जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे.

केंद्रीय कामगार, कर्मचारी, शेतकरी संघटना, ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत नेत्यांनी राज्यशासनाच्या उदासीन धोरणाबाबत खंत बोलून दाखवली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यांत ठोस निर्णय झालेले नाहीत. त्यासाठी संघटनेमार्फत सातत्याने पत्रव्यवहारही केला गेला; परंतु संघटनात्मक प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी शिक्षकांमध्ये असंतोष धुमसत आहे.

शासनाला जागे करण्यासाठी आज कर्मचारी, कामगार संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सहभागी होणार आहे. आज दुपारी १ ते ३ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालय आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव प्रवीण पिलणकर व कार्याध्यक्ष सुरेंद्र खाडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 09-07-2025