देशव्यापी संप: बँकिंग व्यवहार आज ठप्प होण्याची शक्यता..

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व बँकिंग उद्योग विरोधी धोरणाविरोधात कामगार आज (ता. ९) देशव्यापी संपावर जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील बँकर्स, वाहतूक व औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर नसल्याने शाळा मात्र चालू राहणार आहेत. सरकारी कर्मचारी समन्वय समिती संपात भाग न घेता निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी निवेदन देणार आहे.

संपामुळे आज बँकिंग व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे; मात्र विविध राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने संपात भाग न घेता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात येणार आहे. संपामुळे वाहतूक, बँकिंग, सार्वजनिक सेवा, औद्योगिक क्षेत्र आणि इतर अनेक सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँका आणि सरकारी कार्यालयांमधील कामकाजावरही परिणाम दिसून येईल. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांतर्फे शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाबाहेर सकाळी १०.३० वाजल्यापासून निदर्शने करण्यात येणार आहेत.

दरम्यान, संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 09-07-2025