मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर जून महिन्यात पावसामुळे पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराने (ता. ७) सुरुवात केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील गतवर्षीचे बांधकाम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे पावसात खड्यांसह अन्य विविध समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते. तालुकावासीयांच्या अडचणीत पावसाच्या आपत्तकालीन परिस्थितीची भर पडली होती. म्हाप्रळ ते मंडणगड या दोन गावांच्या हद्दीतील १८ किलोमीटर लांबीच्या अंतरात असलेल्या खड्ड्यांमध्ये नऊ जुलै रोजी वृक्षारोपण करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आला होता. तसे निवेदनही प्रशासनाला दिले होते. या निवेदनाची दखल स्थानिक तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी तातडीने घेतली. प्राधिकरण तसेच ठेकेदार यांच्याशी चर्चा करून तातडीने खड़े बुजवण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणेने खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने यंत्रणेला जाग आल्यामुळे तालुकावासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, केवळ मंडणगड ते म्हाप्रळ या अंतराबरोबर मंडणगड ते आंबडवे या अंतरातील खड्डेही पूर्णपणे बुजवून रस्ता वाहतुकीयोग्यतेचा करावा, अशी मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 09/Jul/2025














